दिल ढुंडता है फ़िर वही फ़ुरसत के रात दिन.. अस दिल कधिपासून भुणभुणत होत, शेवटी दिलाला फ़ुरसत देण्यासाठी आरती सह सात दिवसांची इटली ची सफ़र करायच ठरवल. उडत उडत वाचलेला इतिहास , फ़ेलिनीचा अमरकॉर्ड आणि गॉड फ़ादर सारखे चित्रपट, एवरी बडी लवस रेमंड ही विनोदी मालीका, ईटालीयन जेवण आणि प्रत्यक्ष काही इटालीयन व्यक्तिंशी आलेल्या संबंधा मुळे इटली बद्दल विलक्षण कुतुहल होत. इंटरनेट वर थोड्या क्लिक्स आणि एक दोन फ़ोन झाले आणि रोम, फ़्लोरेन्स व वेनिस बघण्याचा बेत पक्का झाला.
भारताची जशी एयर इंडिंया तशी इटली ची ऍलिटालीया. पण ह्या हवाईसेवेच आतिथ्य म्हणजे एकंदरीत आनंदच होता. इटालियन भाषा ऐकायला तशी खडखडीतच त्यातून हवाई सेवकांच्या चेहेऱ्यावर कायम उद्धट आणि त्रासिक भाव. हसू सहज उमटायला तयार नाही. पर्याय सुचवण्या ऐवजी ठाम पणे नाही सांगण्या कडेच कल अधिक. गिळा मेल्यांनो म्हणत त्यांनी पहिल जेवण समोर आदळल. जेवण इतक भिकार की इटालीयन जेवणाच लोक एवढ कौतूक का करतात असा प्रश्ण पडावा. जेवण झाल्या नंतर मात्र हवाईसेवकांचा उत्साहा वाढलेला दिसला. काही जण कोपऱ्यात एकत्र आले आणि खिडकी जवळ्च्या राखीव खुर्च्यांच्या भवती पडदे लावायला सुरवात केली. आमच्या सकट इतर प्रवासी हा प्रकार कुतुहलाने बघत होते. कुणाला शंका आली कि कदाचित कुणि बाई विमानात प्रसूत होणार असावी. पण अस काही अचाट बघायला मिळाल नाही. हवाई सेवाकांचा हा सारा खटाटोप स्वत:च्या झोपण्याच्या तयारी चा होता. जेवण झाल्या नंतर इटालियन प्रथे पणे ते वामकुक्षी घेत होते. स्वत:चीच सेवा करणारा हवाईसेवकांच पथक मी पहिल्यांदाच पाहिल.
हा प्रकार माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन जोडप्यालाही हास्यास्पद वाटला. संवाद साधयला तेवढ कारण पुरेस होत. बोलण्यातून कळल की जोडी १५ दिवसाच्या मेडीटरेनीयन क्रुज ला निघाली होती. बोलता बोलता बाईनी स्वत:ला इन्जेक्शन टोचून घेतल. बाईला डायबिटिस चा त्रास असावा. तरीच थोडा वेळ झाला की घरून आणली फ़ळ आणि बिस्कीट खात होती. वेनिस हे एक महाकाय बाथरूम आहे अस नवऱ्या ने स्वच्छ मत मांडल. आधिच ऍलिटालीयावाले इटली बाबत माझा विरस करत होते, वेनिस बद्दल हे मत ऐकून विमान परत फ़िरवाव कि काय अस वाटू लागल. ही मंडळी मिशिगन च्या लॅन्सींग ह्या गावी रहाणारे होते. मी अमेरिकेत पहिल्यांदा आलो तो लॅन्सींग मधे राहिलो होतो. इथल्या लोकांना जपानी गाड्यांची अलर्जी आहे. बोलण्याच्या ओघात नुकत्याच टोयोटा च्या अनेक गाड्या मधली घातक बिघाडी उघडकीस येऊन ही टोयोटा ला फ़ायदा झाला ह्या बाबतीत नवरा कुरकुरला. अमेरिकन कार बद्द्ल चे माझे डावे मत आणि जपानी कार वर असलेली माझी श्रद्धा मी त्यांच्या पासून दडवून ठेवली. छोट्या प्रवासात सहप्रवाशांबरोबर उगाचच मतभेद कशाला.
जेवणा नंतर अंधार करण्यात आला मधल्या जुनाट स्क्रीनवर एक भिकार इंग्रजी आणि एक इटालियन चित्रपट दाखवला. भारताच्या चित्रपटाच्या तुलनेत ईटालियन चित्रपट सध्या अत्यंत दयनिय अवस्थेत आहे अस जाणवल. नऊ तासांचा प्रवास शेवटी एकदाचा आटपला आणि रोमच्या लियोनार्डो विंची - फ़्युमिनिको एयर पोर्ट वर विमान उतरले.
रोमचे विमानतळ अतिविशाल आहे. विमानातुन उतरून सामाना च्या जागे पर्यंत पोहोचायला आम्हाला छोटा प्रवासच करावा लागला. पासपोर्ट चेक साठी एका विस्कळीत रांगेत उभे राहीलो. खीडकी वर आम्ही पोहोचे पर्यंत खीडकी च्या पलीकडच्या व्यक्तीच काहितरी बिनसल आणि त्यानी आपली जागा सोडून फ़ेरफ़टका घेण्याचा निर्णय घेतला. काही क्षण आम्ही धड न प्रवासात ना रोम मधे अशा त्रिशंकू स्थितित राहिलो. शेवटी शेजार च्या अधिकार्याने चरफ़डत का होईना आमाचे पासपोर्ट हातात घेतले आणि रुक्ष पणे प्रेगो म्हणून आमची तपासणी पुर्ण केली. प्रेगो हा इटालीयन शब्द गोंधळात टाकणारा आहे कारण संदर्भा प्रमाणे त्याचे अनेक अर्थ आहेत – पुढे व्हा, आपल्या नंतर, कृपया, अच्छा, स्वागत आहे…. सध्य स्थितित आम्ही प्रेगोचा अर्थ स्वागत आहे असा घेतला आणि मे २०१० च्या पंधरा तारखेला सकाळी ८ वाजून ३२ मिनटानी आम्ही रोम मधे प्रवेश केला.
सामान घेऊन बाहेर पडलो तेंव्हा एक प्रसन्न चेहऱ्याची व्यक्ती आमच्या नावा चा फ़लक घेऊन उभी होती. स्वत:ची ओळख त्याने ऍलेक्सांड्रियो म्हणून केली. तो आमच्या होटेल पर्यंत पोहोचवणारा ड्रायवर होता. आमच सामान त्याने गाडीत चढवले आणि गाडी हॉटेल च्या दिशेला वळवली. बाहेर झिमझिम पावसात रोमच पहिल दर्शन घडत होत. मधेच ऐतिहासीक स्मारक दिसली. वस्तीत आल्या नंतर तळ मजल्यावर दुकान आणि वरच्या इमारतीत लोकांचे निवास दिसले. घरांना बालकनी होत्या. बालकनीत फ़ुलांच्या कूंड्या होत्या. काही भाग तर भारतात असल्या सारखेच दिसत होत. गाडीतल्या काचेतून दिसणाऱ्या ह्या दृश्या पेक्षा वर्तमान इटलीचे मार्मिक दर्शन घडवले ते ऍलेक्सांड्रियोने. त्याच इंग्रजी बेताच असलतरी त्याची संवाद साधायची इच्छा होती. माझ बोलण कळल की अटेन्शीय़ोन अस म्हणून कळल कळल अस सांगायचा.
इती ऍलेक्सांड्रियो उवाच - इटली चे राजकारण डावे आणि उजवे मिळून चालवतात. बरीच वर्ष शिक्षण आणि कायदा डाव्यानी चालवल्या मुळे नवीन पिढिवर डाव्या विचारसरणिचा परिणाम अधिक आहे. इटलीयन लोकांचे शिक्षणाची आणि तब्येती ची काळजी सरकार घेते. पण मध्यम वर्गी लोकांना सतत महागाईला तोंड द्याव लागत. पेट्रोल परवडत नाही. बॅंका चे व्याजा चे दर ज्यादा आहेत. इटली चे चलन लिरा असताना ज्य गोष्टी हजार लिरात यायच्या त्या आता पन्नस युरोत येत नाहीत. इटलीत लहान धंदे जोरात चालत आहेत पण जर्मनी सारखे मोठे उद्योग धंदे इटलीत नाही. इटलील पोर्क सर्वोत्कृष्ट आहे पण अमेरिकेची बाजर पेठ त्यासाठी खूली नाही. बुश नी इराण युद्धात ढकलल्या मूळे इटालीयन बूश वर नाराज आहेत. इटालीयअन लोकांना वाटत अमेरीकेने इराण युद्ध हे निव्वळ पेट्रोल वर ताबा मीळवण्या साठी केल. अमेरिकेला चणचणीतुन मार्ग काढायची सवय नाही. सतत होणाऱ्या आक्रमणा मूळे सामान्य इटालीय़न नेहेमी चणचणीतच जगला आहे. क्लींटन बद्द्ल मात्र बरच अनुकुल मत आहे. क्लींटनची प्रकरण इटालियन फ़ारशी मनावर घेत नाहीत. असली प्रकरण इटलीत राजेरोस चालतात. न्युयार्क एक अधुनिक अग्रणी शहर आहे पण रोम सारख ऐतिहासीक शहर दुसर नाही. पॅरीस च्या लुव्र ह्या प्राख्यात म्युजीयम मधे अर्ध्या अधिक कलाकृती इटालीयन कलावंतांच्या आहेत.
आतापर्यंत अनुभवलेल्या इटालियन शुष्क वागणूकीच बोलघेवडा ऍलेक्सांड्रियो परिमार्जन करत होता. तीस मीनटाचा वेळ कसा गेला कळल देखिल नाही ऍलेक्सांड्रियोनी खऱ्या अर्थानी इटलीत आमच प्रेगो केल. त्याचे धन्यवाद मानून आम्ही आमच्या डेले नॅझीयोनी ह्या होटेल मधे प्रवेश केला.
रोम न्युयार्क पेक्षा सहा तासानी पुढे आहे. जेट लॅग आणि प्रवासाच्या दगदगी मूळे होटेल मधे पोहोचल्या पोहोचल्या तीन तास ताणून दिल. पण डोक्यात सतत ही जाणिव होती कि वेळ कमी आणि बाघायची ठीकाण खूप आहेत. संध्याकाळी आम्ही दोघांनी स्वत: ला होटेलच्या बाहेर ढकलल. आमच होटेल रोम च्या अगदी मध्यवर्ती होत. होटेलच्या रिसेप्शन डेस्क ला आजुबाजुची माहिती विचारली. त्यानी नकाशे दिले. मी खिश्यातला कॅमेरा व पाकीट चाचपून बघितल आणि आम्ही रोम च्या पहिल्या फ़ेर फट्क्या साठी सज्ज झालो. हॉटेल पासून चार पावलांवर एका वळ्णावर नाट्य पुर्ण पद्धतीने त्रेवीच विशाल कारंज दृष्टीपथात आल.
त्रेवी म्हणजे तीन मार्ग जोडणारी त्रीवेणी. पुरातन रोम मधे एका कुमारिकेच्या मदती ने १४ मैल लांब शुद्ध पाण्याचा उगम सापडला. हे पाणी शहराला पुरवण्या साठी ओढे बांधले गेले. त्रेवि च कारांज त्या ओढ्याच्या गोमूख आहे. कारंजाच्या मागे पाण्याच्या उगमाचा शोधाच वर्णन आहे. कारंजात पैसे टाकल्यास इच्छापुर्ती होते अशी वदंता आहे. खर खोट देव जाणे. पण त्रेवी च कारंज आहे देखण. दिवसाच्या कुठच्या ही प्रहरी जा, पाऊस असो वा उन , नेहेमी गर्दीने बहरलेल असत.
रोम शहर ’वि’ आणि ’पियाज्जा’ ह्यांनी गुंफ़ल गेल आहे. ’वि’ म्हणजे मार्ग आणि ’पियाज्जा’ म्हणजे चौक. रोमचे सगळे पत्ते वि आणि पियाजाच्या संदर्भात दिले जातात. एवढ्या ज्ञानप्राप्ती नंतर आम्ही अधिक भटकायचे ठरवल. थोड पुढ गेल्या नंतर पुरातन कोरीव खांबांची ओळ दिसली त्यावर जुनाट रोमन आकडे कोरले होते. हे काहितरी महत्वाच नक्की असणार अस वाटत होत. आमच्या होटेल जवळ पॅंथियन नावाची प्रसिद्ध जागा आहे अस वाचल होत मग हेच ते पॅंथियन आहे असा कयास बांधून त्या जागेचा फ़ोटो ही काढला. आणखीन काही वि आणि पियाजा पार पाड्ल्या नंतर स्पॅनिश स्टेप्स ला जाऊन पोहोचलो. कुणा एके काळी ग्रेगरी पेक आणि कॅथरीन हेपबर्न चा रोमन हॉलीडे पाहिला होता. त्यातला स्पॅनिश स्टेप्सचा देखावा डोक्यात होता. पण प्रत्यक्षापेक्षा हे स्थळ सिनेमातच अधिक रोमॅंटिक वाटत. ह्या पायऱ्यांच्या जवळच एका गल्लीच्या कोपऱ्यावर आम्ही फ़ेरीवाल्या कडून भाजलेले चेस्टनट घेतेले. आपल्या केडे मिळणाऱ्या शींगाड्याच्या चवी चे होते. पण ओल्या हवे अस काहितरी खायला छान वाटल. पुढे गल्लीत गुची, लुई वुटॉन, जिओर्जिओ अरमानी, वरसाची अशा नामवर इटालियन डिजायनर्स ची दुकान होती. ह्या दुकानातल्या मालाची किम्मत बघितली तर डोळे पांढरे होतात. लुई वुटॉन च्या दुकानात एका छोटी पर्स बघितली. भारतात सखी कलेक्शन्स किंव्हा तत्सम दुकानात त्या सारखी पर्स दोनशे रुपयाला विकायला कुठच्या ही दुकानदाराला नाकी नऊ आले असते. पण तशाच पर्स वर एल आणि वी ही इंग्रजी अद्याक्षरांची बाळबोध नक्शी काम करून हा लुइ वुतोन नामक दुकानदार ही पर्स दिवसा ढवळ्या ११८०० रुपयाला बेदरकार पणे विकत होता. आणि त्याहून कमाल म्हणजे लोक विकत घेत होते. ११८०० ही किंमत पर्स मधे वापरलेल्या मालाची आणि कारिगिरिची नसून जगातल्या सगळ्या मोठ्या विमानतळांवर आणि चकचकित मासिकांमधे सुपर मोडेल्स ना घेऊन केलेल्या लुइ वुतोन च्या नावाच्या जाहिरातीची होती. आरतीला मी माझ्या मनातले हे विचार सांगीतले नाही कारण ती ह्या गल्लीत येऊन सद्गदित झाली होती. ह्या चोरबाजारातून बाहेर पडल्या वर आम्हाला प्रचंड भूक लागली. वाटेत घेतलेल्या काही गोष्टी ठेवायला होटेल मधे परत गेलो.
रिसेप्शनला जवळ पासच्या चांगल्या खाण्याच्या जागेचा पत्ता विचारला. त्यानी पॅंथियन जवळच्या एका रेस्टरॉंचा पत्ता सांगीतला. पटकन जेवून झोपायच ठरवून आम्ही निघालो. नुकतच पॅंथियन पाहिल असल्या मूळे आत्मविश्वासाने नीघालो पण वि आणि पियाज्जा च्या जाळ्यात असे काही अडकलो की पाऊण तास आम्ही त्याच परिसरात गरगरत राहीलो. पोटातले कावळे ओरडून रडकूंडीला आले होते. शेवटी कळल की ज्याला मी पॅंथियन समजत होतो ते पॅंथियन नव्हतच. एकदा ही चूक कळल्या नंतर रेस्टरॉं मीळायला वेळ लागला नाही.
जेवणाचा मेनू इटालियन भाषेत होता. त्यात इटालिय जेवणातल्या पाच कोर्सची मांडणी होती. पाची भागातल मागवून खाव लगणार का हा पहिला प्रश्ण होता. कारण तेवढ खाण पोटाला आणि पाकिटा ला झेपणार नव्हत. त्यात ओळखीच काही दिसत आहे का हे पहायचा प्रयत्न केला. आरती शाकाहारी असल्या मूळे जे मागवले त्यात मास मच्छी नाही ह्याची हमी हवी होती. शेवटी वेटरशी तोडका मोडका इंग्रजी संवाद साधला. सगळ्या शंकांच निरसन केल. आणि रोम मधल्या पहिल्या इटालियन जेवणाची ऑर्डर दिली. आरती ने पालक आणि चीज ची भरली रॅविओली मागवली आणि मी मेडीटेरीयन समूद्रात सापडणारा टरबो हा मासा मागवला. जेवणा बरोबर पांढरी वाईन मागवली. वाईन इथे ग्लासाच्या नव्हे तर बाटली च्या हिशोबाने मिळते. आता पर्यंत अमेरिकेत खाललेल्या इटालीय़न खाण्या पेक्षा हे जेवण कितितरी चविष्ट होत. खायचा प्यायचा मनमुराद आनंदा घेऊन आम्ही होटेल वर पोहोचलो. रोम मधला पहिला दिवस संपला. उद्या पोम्पे बघण्या साठी लवकर ऊठायच होत.
सकाळी बस मधे बसल्या वर सगळ्यांच्या डोक्यात पहिला प्रश्ण होता - न्याहारी साठी कधी थांबायच ? कारण सकाळी सातलाच निघाल्या मुळे होटेल मधली न्यायाहारी हुकली होती. टूर गाईड वयस्कर होता आणि त्याच्या आवाज देखिल थकलेला होता. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून बस सुरु झाली तशी सगळ्यांनी एक डूलकी काढली. आकाशातले ढग काही हटायला तयार न्हवते. मधेच कुठ तरी एक टेकडी लागली त्यावर एक अलिशान राजवाडा होता. टुर गाईड नी एकेकाळी हा राजवाडा जगात सगळ्यात मोठा होता अस सांगीतल. मग काहीजणांनी काढायचे म्हणून त्याचे फ़ोटो काढले. खिडकी तून दुतर्फ़ा छत्री सारखी दिसणारी झाड दिसत होती. पाईन ची ही झाड रोम च वैशिष्ट आहे. न्याहारी चा थांबा आला. सगळे उतरले. सकाळ्च्या कॉफ़ीचा घोट घशात गेल्यावर बर वाटल. इटली मधे कॉफ़ी च बरच प्रस्थ आहे. कॉफ़ी चे प्रकार तरी किती – छोट्या कपातली अत्यंत कडक कॉफ़ी - एस्प्रेसो , कपुचिनो – दुध घातलेले एस्प्रेसो , कॅफ़े लाते – दुध घातलेली मवाळ कॉफ़ी – अशे अनेक. बर प्रत्येक प्रकारची कॉफ़ी कधी आणि कशी प्यायची ह्याच्या बद्द्लही कडक शास्त्र आहे. कपुचिनो ही फ़क्त सकाळीच प्यायची. जेवण झाल्या नंतर कधिही नाही. ऊभ राहून प्यायलेली कॉफ़ी बसून प्यायलेल्या कॉफ़ी पेक्षा बरीच स्वस्त असते. मला कॅफ़े लाते ही त्यातल्यात्यात आपल्या कॉफ़ी च्या जवळ ची वाटली. पण कॉफ़ी च्या दुधाला फ़ेस आणल्या शीवाय इटालियन लोकांना चैन पडत नाही.
न्याहारी झाल्या नंतर बस मधले पॅसेंजर उत्साहीत झाले. गप्पांची कुजबूज वाढू लागली. ऑस्ट्रेलियन प्रवासी बरेच होते. काही तासानी नेपल्स आल.
नेपल्स शहरा मागे मोठा इतिहास आहे. मुळात हे शहर उभ केल ग्रीक लोकांनी. शहाराला मनोहर समुद्र तट आहे. महायुद्धात ह्या शहरावर सगळ्यात अधिक बॉम्ब पडले होते. मारगारीटा पिझ्झा हा मुळात नेपल्स चा हे कळल्या वर ह्या शहाराच महत्व एकदम पटल. पाऊस असल्या मूळे शहरात पायी फ़िरायला मिळाले नाही. शहराच्या मध्य भागात एक शानदार किल्ला आहे. शहर सोडता सोडता एका मोठ्या जाहिरातीवर ऐष्वर्या राय च सुंदर वदन दिसल. त्या मूळे ती खरच विष्वसुंदरी असल्याची खात्री पटली. मनात म्हटल क्या बात है.
नेपल्स नंतर आला माऊंट वेसुवियस. ढगाळलेल्या हवेत हा डोंगर अत्यंत साधारण वाटत होता. पण पोम्पे शहर अनेक वेळा बेचिराख करणारा ज्वालामुखी ह्या पर्वतात धगधगला होता हे कुणालाही खर वाटणर नाही. शेवटी आम्ही पोम्पे ला येऊन पोहोचलो.
पोम्पे ला पोहोचे पर्यन्त जेवायची वेळ झाली होती. जेवण टूर वाल्यांकडून च होत त्या मूळे फ़ारशा अपेक्षा नव्हत्या. जेवायला आमच्या बरोबर विक्टर नावाचा अमेरीकन आणि नॅगो नावाचा एक वयस्कर औस्ट्रेलियन होता. विक्टर सुपर मर्केटचा मॅनेजर होता आणि नॅगो नीवृत्त होता. दोघही बोलके निघाले. विक्टरला एकट प्रवास करायची हौस होती. मग अमेरीकन राजकारण, अमेरिकेतली आरोग्य व्यवस्था ह्या वर चर्चा रंगली. नॅगो च्या म्हणण्या प्रमाणे अमेरिकेत माणूस सहज बंदूक विकत घेऊन गोळीबार करू शकतो पण इन्शुरन्स नसला तर स्वत:चा जीव वाचवू शकत नाही. गप्पांच्या नादात आणि भुके मुळे जेवणाचा बेचवपणा जाणवला नाही. जेवणानंतर पोम्पे चे अवशेष पहायचे होते.
३००० वर्षा पुर्वी पोम्पे चे शहर वेसुवियस च्या ज्वाला मुखीच्या स्फ़ोटा मूळे बेचिराख होऊन राखे खाली गाडल गेल होता.
पाचशे वर्षा पुरवी च्या उत्खननात ह्या शहराचा शोध लागला. तेंव्हा पासून पोम्पे चे अवशेष पर्यटकांचे आकर्षण ठरल आहे. उत्खननाचा परिसर योग्य ठिकाणी कुंपण घालून काळजी पुर्वक जोपासला आहे. थोड्या चढावा नंतर आपल्याला फ़ोरमचे अवशेष दिसतात. फ़ोरम म्हणजे गावाच सामाजीक केंद्र. तिथे बाजार पेठ भरते, तिथे मंदिर असतात, तिथे राजकारणाच्या चर्चा होतात, वाद होतात. ती भेटण्या ची आणि गावा संदर्भात महत्वाचे निर्णय घेण्याची जागा असते. असे फ़ोरम रोम मधे ठिकठिकाणी आहेत. रोमन संस्कृतीच्या विकासात फ़ोरम च बरच महत्व आहे. फ़ोरम सरला कि दिसतात अरूंद दगडी रस्ते आणि त्यांच्या आजुबाजूला असलेली दालन. अशाच एका दालनाच्या गजा आड माती ची गाडगी मडगी दिसतात आणि दुसऱ्या दालनात एक विलक्षण दृष्य पाहिला मिळत. एका पुरूष आणि लहान मुली चे कलेवर प्लास्टर चा कास्ट करून संवर्धन केल होत. पुरूष त्या मूलीला आगीतून वचवण्याच्या प्रयत्नात होता. ते दृष्य बघून पोटात गलबलायला झाल. दगड माती च्या ह्या ढीगारात एके काळी मूलांचे हसण्या खेळण्याच चे आवाज असतील. एकाएकी अवशेषांकडे बघायची माझी दृष्टी बदलली. आम्हाला मध्यम वर्गी घर आणि श्रीमंतांचि घर दाखवली
घरा समोर आपल स्वागत आहे अस कोरल होत. घरा ला उजेडा साठी स्काय लाईट्स होते. भिंतींवर फ़्रेस्को प्रकाराची चित्र होती. अंघोळी ची उत्तम व्यवस्था होती. गावात खाद्य पदार्थ विकण्याची ठिकाण होती. बेकरी होती. श्रिमंतांच्या घरात बाग बगीचे होते. घोड्यांना ठेवायची जागा होती. छंदी फ़ंदी पणा करायला माडी देखील होती. एके काळी हे गाव जिवंत होत ह्याच्या खूणा जागोजागी होत्या. दोन तासाची परिक्रमा संपली तरी पोम्पे बराच काळ मनात रेंगाळत राहील. परतताना माऊंट वेसुवियस परत पाहिला. आता ही तो शांत दिसत होता पण त्याच्या पोटातल्या निद्रस्थ ज्वालामूखी जागृत झाला तर ह्या परिसराच काय होईल ह्याची कल्पना आली होती. दिवस भराचा प्रवास आणि पायपीटीमूळे थकवा आला होता आणि भूक ही लागली होती. रात्री होटेल च्या अगदी जवळ असणाऱ्या रेस्टरॉं मधे खायला गेलो. एकतर जागा गिचमिडी होती. आम्हाला दोन टेबलां च्या मधे कोंबल होत. वेटरेस च्या चहेऱ्यावर आमच्या पेक्षा जास्त थकलेला भाव होता. कस बस खाण पीण संपवून आम्ही दिवस संपवला. उद्या रोम मधला शेवट चा दिवस होता आणि बरच काही पहायच होत.
सकाळी उठून प्रथम हॉप इन हॉप आऊट बस ची तिकीट काढली आणि पहिली भेट दिली ते वॅटिकन ला. वॅटिकन म्हणजे पोपच राज्य. रोम मधला साधारण ११० एकराचा हा भाग एक स्वतंत्र देश आहे.
पोपचा चोरट्या इटालीय़न्स वर विश्वास नसल्या मूळे वॅटिकनचा सारा कारभार स्वीस लोक पहातात. कदाचित मनात भक्तीभाव नसल्यामूळे असेल अथवा आपल्या कडे तिर्थस्थाना वर जी एक प्रकार ची अवकळा असते त्याचा अभाव असेल पण रोमन क्रिस्तांच तिर्थस्थान असलेल वॅटिकन आम्ही पाहिल ते एक म्युजीयम म्हणून. वॅटीकन मधल्या चित्र आणि शिल्पां समोर मात्र शिश झूकत.
मायकलअँजेलोच सिस्टीन चॅपेल मधली चित्र आणि त्या मागची संकल्पना मानवी संस्कृती चा एक मानबींदू मानावा लागेल. मायकल अँजेलोच्या चित्रांची फ़ोटो काढायला सक्त मनाई आहे. त्याच कारण अस की फ़ोटो आणि फ़िल्मींग चे सगळे हक्क एका जपानी कंपनी च्या स्वाधीन आहेत. सिस्टीन चॅपेल च्या पुनरोज्जिवनात ह्या जपानी कंपनी चा मोठा भाग होता त्या मोबदल्यात ह्या कंपनी ला हे विशेष हक्क मिळाले. पोपसाहेब चुकून खिडकीतून डोकावताना दिसता का म्हणून बघत होतो पण ते जगाची चींता करण्यात व्यस्त आसावेत. पोपच दर्शन विशिष्ट दिवशी घेण्याची सोय आहे पण दिवसाच आणि वेळेच गणित न जुळल्या मुळे आमची पोप साहेबांची भेट होऊ शकली नाही. त्या बद्द्ल मला फ़ारस वाईट वाटल नाही. कॉनवेंट मधे शिक्षण झाल्या मूळे मला पांढरे झगे घातलेल्या पाद्र्यांचा धसका आहे. कधि पट्टी काढून मारतील ह्याचा नेम नाही. यशूच्या करूणे पेक्षा वॅटीकन मधे जाणवली ती आजी माजी पोप ची अफ़ाट श्रीमंती. अर्थात त्या श्रीमंती च्या आधारा मूळेच प्रतिभावंत कलाकार अमर कलाकृती निर्माण करू शकले.
वॅटीकन च्या भेटी नंतर पिज्झा आणि लसानिया च जेवण केल. थोडी खरेदी केली आणि बस घेऊन कोलोसियम ला उतरलो. अधुनिक जगातले स्टेडीयम आणि क्रिडा संकुलांच प्रेरणास्त्रोत्र असलेल्या ह्या रोमन कोलोसियम चा अवाका पाहून अवाक व्हायला होत. कोलोसियम मधे शिरता शिरता पावसाची सर आली. छत्री होती तरी एका बांगला देशी ठेल्या वरून पार्का विकत घेतला. इटलीत असे बांगला देशी बरेच दिसले. त्यांच्याशी सहज संवाद मात्र साधता येत नाही. कोलोसियम मधे विशेष गर्दी न्हवती. पहिल्या शतकात ह्या कोलोसियम च बांधकाम पुर्ण झाल.
ह्या कोलोसियम मधे ५०,००० लोक बसण्या ची व्यवस्था होती. मधल्या प्रांगणात ग्लॅडीयेटर्स (योद्ध्यांच्या) स्पर्धा, जलसेनेच्या कवायती, प्राण्यांची शिकार, गुन्हेगारांचे शिरस्त्राण, युद्धांची प्रात्यक्षीक आणि पौराणिक कथेवर आधारीत नाटकांचे प्रयोग व्हायचे. कोलोसियम बघुन रोमन वास्तूशास्त्र आणि तंत्रज्ञान त्या काळात किती प्रगत होते ह्याची प्रचिती येते.
कोलोसियमला लागून आहे रोमन फ़ोरम.
पॉम्पेच्या अवशेषात पाहिलेल्या फ़ोरमची ही आद्य अवृत्ती. ह्याच जागी प्रातिनिधिक सरकार आणि सेनेट च्या संकल्पनांचा जन्म झाला. ह्याच जागी रोमन साम्राज्या ची मुहुर्त मेढ रचली गेली.
ह्याच जागी सिजर नी मोठे निर्णय घेतले.
ऐतिहासीक रोम आता अंगावर येऊ लागल होत. रस्त्यावर कुठ ही दृष्टीक्षेप टाकला तरी एखादी तरी ऐतिहासीक वास्तु दिसायचीच. आज रोम मधला शेवट चा दिवस. ट्रेवी कारंज्याच्या जवळ एका रेस्टरॉं मधे मनसोक्त खाण पिण झाल. इटली च्या तिरामसू नावाच्या मिष्टान्नाचा अस्वाद घेतला आणि उद्याच्या फ़्लोरेन्स च्या भेटीच्या तयारीला लागलो.
रोमच्या मेत्री स्टेशना वरून बरोबर साडे सात वाजता ट्रेनिटालीया (भारतीय रेल चा इटालीयन आविष्कार ) ची फ़्रेचिआर्जेन्तो ( महालक्ष्मी एक्सप्रेस चा इटालीयन अवतार ) फ़्लोरेन्स च्या दिशेनी सुटली. फ़्रेचिआर्जेन्तो चा वेग ताशी २५० कि.मी. पर्यंत जाऊ शकतो. गाडी मधे काही आम्हाला हा वेग जाणवला नाही. प्रत्येक वेळी बाहेर सुंदर दृष्य आल की गाडी बोगद्यात जायची. गाडीचा वक्तशीरपणा काटेकोर होता. बरोबर ९:२० ला आम्ही फ़्लोरेन्स स्टेशन वर दाखल झालो. स्टेशन वरच्या पर्यटन चवकशी केंद्राला सरकारमान्यतेची अवकळा होती. त्यानी सांगितलेल्या दिशेचा उलटा अर्थ लावून आम्ही भलत्याच रस्त्याला लागलो. समोर एका बांगला देशी च्या दुकानात गेलो तर त्यानी माझ इंग्रजी न समजल्याचा आव आणला. शेवटी शेजार च्या दुकानातल्या इटालीयन मुली ला माझ इंग्रजी कळल आणि तिने मला योग्य दिशा दाखवली. स्टेशन वरून बाहेर आल्या आल्या फ़्लोरेन्स शहर डोळ्यात भरत नाही. सगळि कडे जुनाट पिवळट भिंतीच्या इमारती दिसतात. आमच्या होटेल मधून तर फ़क्त जूनाट इमारतीच दिसत होत्या.
दुपारी आम्ही फ़्लोरेन्स बघायला बाहेर पडलो. पहिल ठिकाण निवडल ते होत उफ़्फ़िज़ि संग्रहालय. ह्या संग्रहालयात बोटिचेलि, मायकलअँजेलो, लिओनार्डो विन्चि, राफ़ाएल्लो, जिओतो अशा नावाजलेल्या कलाकारांच्या कलाकृती होत्या. संग्रहाल्यातील प्रवेशा ची रांग एवढी हळू पुढे सरकत होती की आम्ही शेवटी नाद सोडला आणि तिथून सटकलो. काही सटर फ़टर जागा बघीतल्या आणि थोडस खाऊन पियाज़्ज़ले मायकलअँजेलोला जाऊन पोहोचलो. उंच पर्वतावरच हे मायकलअँजेलोच स्मारक आहे. मायकलअँजेलोच्या डेवीड ह्या शिल्पाची प्रतिकृती उभारलेली आहे .
ह्या जागेतून खाली पसरलेल्या फ़्लोरेन्स शहराचे विहंगम दर्शन होते. उंच मनोरे, चर्च चे विशाल गोल घुमट, मधे वहाणारी आर्नो नदी. फ़्लोरेन्स ची जगातल्या सूंदर शहरात गणना का होते ते इथ कळत. फ़्लोरेन्स शहर रोम सारखे अंगावर येत नाही पण त्याच महत्व आणि सौंदर्य समजायला अभ्यास करावा लागतो. जगाला मध्य युगातून अधुनीक युगात आणण्यात फ़्लोरेन्स चा मोठा हात होता. युरोपच्या भरभराटी मागे फ़्लोरेन्स च्या भांडवलदारांच अर्थकारण होत. मेडीची, डान्टे, मायकलअँजेलो आणि लिओनार्डो विन्चि सारखे दिग्गज फ़्लोरेन्स चे रहिवाशी होते. मेडीची कुटूंबातली कॅथरीन पुढे फ़्रांस ची राणी झाली आणि फ़्रांस च्या सांस्कृतिक जडण घडणीत तीचा मोठा वाटा होता. काट्या चमच्या नी कस खायच हे फ़्रांस ला कॅथरीनने म्हणजे पर्यायाने इटलीने शिकवले. रोमच्या वॅटिकन मधे आणि फ़्लोरेन्स च्या म्युजियम मधे एक गोष्ट जाणवली कि बहुतेक चित्र शिल्पांत माता आणि पुत्र, किंवा देव आणि पुत्र, किंवा एकटा पुरूष , किंवा अनेक पुरूष दिसता. स्त्री आणि पुरूषां मधल्या प्रेम भावने च चित्रण अभावानेच आढळल. ते काम बहूदा अजंता एलोराच्या शिल्पकारांवर सोपवले असावे.
फ़्लोरेन्स चा दुसरा दिवस टसकनी प्रान्ताची झलक बघण्याचा होता. सकाळी आम्ही बस स्थानकावर पोहोचलो. एका शुभ्र हसऱ्या चेहेऱ्याचा बाईने आमच्याशी संवाद साधला. नंतर कळल की आजच्या टूरची ती गाईड आहे. तिनी सर्वांना आपली ओळख मार्मीक पणे करून दिली. तीच नाव होत बेकी. मुळची ब्रिटिश. शाळा संपवून ब्राझील, नेपाळ, दिल्ली अशी वर्षभर परिक्रमा केली. मग ग्रॅजुएट झाली. वर्ष भर नोकरी केली आणि सहा महीन्यासाठी फ़्लोरेन्सला आली. तिथे एका इटालीयन च्या प्रेमात पडली आणि फ़्लोरेन्सची रहिवासी झाली. इटालीयन बरोबर लग्न केल्या मूळे तीला इटालीयन सासूशी सामना करावा लागतो. तीची दोन लहान बाळ आहे. आठवड्यातून दोन दिवस ती टूर गाईड म्हणून काम करते. त्यामूळे तरी तीला मोठ्यांसारख बोलायला मीळत, नाहीतर तीचा बहूतेक वेळे तिच्या लहान मूलांशी बोबड बोलण्यात जातो. बस मधल्या सगळ्या पर्यटकांनी हसी खूशीने स्वत:ला दिवसभरा करता बेकीच्या हवाली केल.